शिक्षण

उद्यापासून बारावीच्या परीक्षा, शिक्षण मंडळाने दिल्या महत्त्वाच्या सूचना

Blog Image
एकूण दृश्ये: 300

उद्यापासून राज्यात १२ वीच्या परीक्षेला (HSC 12th Exam) सुरुवात होत आहे. त्याआधी पुण्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) पत्रकार परिषद पार पडली. बारावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने बोर्डाकडून महत्त्वाची माहिती यावेळी देण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी पत्रकार परिषदेमार्फत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्यात. परीक्षे संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठराविक विषयांसाठी कॅल्क्युलेटरची परवानगी देण्यात आली आहे. मात्र कॅल्क्युलेटर मोबाईल किंवा इतर कुठलेही यंत्र विद्यार्थ्यांकडे असल्यास कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी कुठल्याही आणि कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांना केले आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा ११ फेब्रुवारी १८ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये ८ लाख १० हजार ३४८ मुले, ६ लाख ९४ हजार ६५२ मुली व ३७ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण १० हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी ३ हजार ३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विज्ञान शाखेचे सर्वाधिक ७ लाख ६० हजार ४६ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. कला शाखेचे ३ लाख ८१ हजार ९८२, वाणिज्य ३ लाख २९ हजार ९०५, वोकेशनल ३७ हजार २२६ तर आयटीआयचे ४ हजार ७५० विद्यार्थी आहेत. 

 

परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना १० मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात १०.३० वाजता तर दुपरच्या सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी २.३० पर्यंत विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थितीत असला पाहिजे. प्रचलित पद्धती प्रमाणे माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे. या विषयासाठी १ लाखा ९४ हजार ४३९ विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

----- Advertisements -----

स्वतःला ओळखणे हीच खरी प्रगतीची सुरुवात आहे.

महात्मा गांधी
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin