बुध्द वचन : धम्मच सगळ्यांचा मार्गदर्शक असेल - भगवान गौतम बुद्ध
28 फेब्रुवारीला भंडारदरा येथे धम्म यात्रा आणि दादासाहेब रूपवते जयंतीचे ( जन्म शताब्दी वर्ष ) महोत्सवाचे आयोजन.
अकोले { प्रतिनिधी }
महाराष्ट्र राज्याचे विविध खात्यांचे माजी मंत्री थोर विचारवंत , अष्टपैलू व्यक्तिमत्व अर्थात कालकथित दादासाहेब रुपवते यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९२५ रोजी अकोले आणि संगमनेर तालुक्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवरा नदीच्या काठावर वसलेल्या अकोले या त्यावेळच्या अतिदुर्गम छोट्याशा गावी झाला आणि त्यांचे निर्वाण २३ जुलै १९९९ रोजी मुंबई येथे झाले. त्यांचे स्मारक भंडारदरा येथेच उभारण्याचा निर्णय त्यांच्या अनुयायांनी आणि बहुजन शिक्षण संघाने घेतला. दादासाहेबांचे स्मारक, जेतवन विहार, मुलगंध कुटी विहाराच्या खालच्या बाजूला भंडारदरा येथे उभारण्यात आले. दादासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारी २००० रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. विलासराव देशमुख ह्यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. २८ फेब्रुवारी हा दादासाहेब यांचा जन्मदिन व माघ पौर्णिमाची धम्म यात्रा यात महिनाभराचे अंतर असल्यामुळे दोन्ही कार्यक्रम २८ फेब्रुवारी या एकाच तारखेला साजरे करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यामुळे, २००१ पासून धम्म यात्रा व दादासाहेबांची जयंती हे दोन्ही कार्यक्रम २८ फेब्रुवारीला साजरे करण्यात येतात. अशोक विजयादशमी (दि. १४ ऑक्टोबर १९५६) रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जुना, बुरसटलेला, अन्यायी हिंदू धर्म त्यागून भगवान बुध्दाच्या धम्मात आपल्या लाखो अनुयायांसहित प्रवेश केला. क्रांतीकारक इतिहास घडविणाऱ्या या घटनेमुळे भारतभर बौद्ध धम्माविषयी जागरूकता निर्माण झाली. भगवान बुध्दानी अडीच हजार वर्षांपूर्वी सारनाथ येथे गतिमान केलेले धम्मचक्र (धम्मचक्र प्रवर्तन ) मधल्या काळात थांबले होते. ते भारतरत्न डॉ. बाबासाहेबानी पुन्हा गतिमान केले (धम्मचक्र अनुवर्तन ). हे धम्मचक्र पुन्हा गतीने व जोमाने फिरू लागले. दुर्दैवाने धम्मदीक्षेनंतर थोड्याच काळाने महामानवांचे महापरिनिर्वाण झाले. गावोगावी, प्रत्येक शहरामध्ये धम्म दीक्षेचे कार्यक्रम आयोजित होऊ लागले. धम्मपरिवर्तनची मोठी लाट आली. त्याचबरोबर बौद्ध धम्माच्या अभ्यासाला सुरुवात होऊन मोठ्या उत्साहाने धम्माचा इतिहास अभ्यासला गेला.
दादासाहेब रुपवते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यात धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी धम्मदीक्षेचे सोहळे सर्वत्र आयोजित केले. धम्मबांधवाना एकत्र येण्यासाठी जिल्ह्यात दरवर्षी धम्म यात्रेचे आयोजन करण्याचे ठरविले. त्याचेच औचित्य साधून भंडारदरा या नयनरम्य, निसर्गरम्य , थंड हवेच्या ठिकाणी माघ महिन्याची पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनातील महत्वाच्या दिवशी १९६२ साली पहिल्या धम्म यात्रेचे आयोजन केले. महापरिनिर्वाणापूर्वी अडीच हजार वर्षांपूर्वी कुशीनारा येथे, तथागत भगवान बुद्धांनी आनंदला सांगितले की, धम्मच सगळ्यांचा मार्गदर्शक असेल आणि गुरु ही असेल. भगवंतांच्या जीवनाशी निगडित चार महत्वाच्या घटना ज्या ठिकाणी घडल्या. त्या चार ठिकाणाची धम्म उपासकांनी यात्रा केली तर त्यांना प्रत्यक्ष भगवान बुध्दाना भेटल्याचे पुण्य व समाधान मिळेल.
धम्मयात्रेची आंतरराष्ट्रीय महत्वाची चार ठिकाणे
- लुबिनी: सिद्धार्थ गौतम बुद्धांचे जन्मस्थान.
- बोधगया : कठोर तपस्येंनंतर बोधीवृक्षा खाली ज्ञान प्राप्ती व बुद्धत्व मिळाल्यानंतर सिद्धार्थ गौतम हे तथागत गौतम बुद्ध झाले ते ठिकाण.
- सारनाथ : पंचवर्गीय भिक्खुंना प्रथम उपदेश करून धम्मचक्राला गती दिली (धम्मचक्रप्रवर्तन ) ते ठिकाण.
- कुशीनारा : तथागत भगवान बुद्धांचेमहापरिनिर्वाण जेथे झाले ते ठिकाण. ह्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्य संस्कार झाले. त्यांच्या अस्थींचे वितरण करून आठ दिशांना महास्तूप उभारले गेले.
भंडारदरा येथिल धम्मयात्रा याविषयी
पूर्वीचा अहमदनगर जिल्ह्यातील अलीकडच्या बदललेल्या अहील्यानगर जिल्ह्यातील अतिदुर्गम , विविध बाबींनी मागास असलेला , डोंगराळ भाग अर्थात अकोले तालुक्यात भंडारदरा हे अत्यंत नयनरम्य आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ प्रसिद्ध आहे. सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर असणाऱ्या कळसुबाईच्या पायथ्याजवळ ते आहे. संगमनेरवरून अकोले - राजूर मार्गे भंडारदरा हे अंतर ५० ते ६० की. मी. आहे. तर मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरी जवळ घोटीमार्गे भंडारदरा हे अंतर ३० ते ३५ की. मी. आहे. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथेच प्रवरा नदीवर पूर्वीचा विल्सन डॅम अलीकडेच त्याचे नामकरण क्रांतिकारक राघोजी भांगरे डॅम असे केलेले आहे.
भंडारदरा येथे पहिली धम्म यात्रा १९६२ साली, माघ पौर्णिमेला भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या बागेत साजरी झाली. त्यामध्ये धम्म देसना, प्रवचन, भ. बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर व्याख्याने, धम्म गाणी, सहभोजन होऊन धम्म यात्रा संपन्न झाली. त्यानंतरच्या धम्म यात्रा भंडारदरा येथेच धरणाच्या पायथ्याच्या, आंब्रेला फॉल जवळच्या बागेत किंवा शेंडी गावचे समाज कल्याण केंद्र किंवा विध्यार्थी वसतिगृहच्या जागेत होऊ लागली. १९८७ साली जेतवन विहाराची जमीन विकत घेऊन मुलगंध कुटी बुद्ध विहाराचे बांधकाम पूज्य. चंद्रमणी यांच्या हस्ते भूमिपूजन करून सुरु केले आणि ते सर्व शक्तीनिशी पूर्ण करण्यात आले. यामध्ये दादासाहेब रूपवते यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि सामाजिक विचारवंत ॲड. प्रेमानंदजी रुपवते तथा बाबूजी आणि त्यांचा सहचारीनी प्रा.स्नेहजाताई रूपवते यांचा अत्यंत मोलाचा वाटा या पुढील धम्मयात्रांमध्ये राहिलेला आहे. परमपुज्य बौद्ध धम्माचे धर्मगुरू दलाई लामांच्या हस्ते विहाराचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक वर्षी माघ पौर्णिमेला धम्म यात्रा जेतवन विहाराच्या परिसरात भरू लागली. यापुढे प्रत्येक वर्षी महंनीय पाहुण्यांना आमंत्रित करून, त्यांना "समता भूषण " आणि "समाज भूषण " पुरस्कार देऊन त्या सन्माननीय मान्यवरांचा गौरव करण्यात येतो. त्यांचे विचार ऐकून सगळ्या धम्म यात्रेकरूंचे प्रबोधन होते. त्याच वेळी समाजातील प्रतिष्ठित कार्यकर्त्यांचे सत्कार करून "समाजभूषण " पुरस्कार देण्यात येतो. ही परंपरा खंडित न होता चालू आहे. आतापर्यंत फुजी गुरुजी, भदंत आनंद कौसलायन, प्रा. एस. रिम्पोचे, लामा लोबसंग, पी. के. थुंगन आदी बौद्ध चळवळीचे नेते, लोकमित्र, शांताबाई दाणी, शिरूभाऊ लिमयें, नानासाहेब गोरे, निळू फुले , हुसेन दलवाई, किशोर पवार, आ. ह. साळुंखे, नामदेव ढसाळ, रावसाहेब कसबे, रूपाताई कुलकर्णी, अण्णा हजारे इ. थोरा मोठ्यांचे धम्म यात्रेत स्वागत करण्यात आले आहे.
कालकथित दादासाहेब रुपवते यांच्या विषयी
येत्या २८ फेब्रुवारी रोजी भंडारदरा येथील धम्म यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे कालकथित दादासाहेब रूपवते यांच्या जयंतीचे शंभरावे वर्ष अर्थात शतकपुर्ती जयंती उत्सव आहे तसेच त्यांच्या एकुण जीवनाचा श्वास म्हणजे आजचा बहुजन शिक्षण संघ ही संस्था होय. या संस्थेला देखील स्थापन होऊन 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. या संस्थेचादेखील अमृत महोत्सव सोहळा होय.
दामोदर तात्याबा रुपवते (28 फेब्रुवारी 1925 - 23 जुलै 1999), सामान्यतः दादासाहेब रुपवते म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय राजकारणी, आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील वृत्तपत्राचे संपादक होते. सुरुवातीला ते शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य होते आणि नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य झाले. दादासाहेब रुपवते हे मानवाधिकार नेते बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि अनुयायी होते. ते 3 ऑक्टोबर 1957 रोजी स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक-सदस्य होते. 1968 ते 1978 या कालावधीत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 1972 ते 1975 आणि 1977 ते 1978 या कालावधीत त्यांनी दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले; आणि त्यांच्याकडे समाज कल्याण, गृहनिर्माण, सांस्कृतिक, मत्स्यव्यवसाय, झोपडपट्टी विकास हे विभाग होते. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देखील होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे या 22 खंडांच्या मालिकेचे समिती सदस्य होते.ते साप्ताहिक "प्रबुद्ध भारत" आणि मराठी विश्वकोश, वाई (1962-1966) चे संपादक होते. ते "द रिपब्लिकन" (1960-1962) चे उप-संपादक होते. ते साप्ताहिक "साधना" ट्रस्टचे (1968 - 1978 आणि 1997 पासून) विश्वस्त होते. आंबेडकरांच्या दलित बौद्ध चळवळीपासून प्रेरित होऊन, रुपवते आणि त्यांच्या कुटुंबाने १९५६ मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांचा मुलगा प्रेमानंद रुपवते हे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी होते.अहमदनगरमधील दादासाहेब रुपवते विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय हे त्यांच्या नावावर आहे.
या वर्षीची धम्मयात्रा अत्यंत उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर दादासाहेबांचे सर्व कार्यकर्ते ,हितचिंतक तसेच बहुजन शिक्षण संघ या संस्थेच्या विविध विद्यालये , महाविद्यालये आणि वस्तीगृहे यामधुन शिक्षण घेऊन त्यांच्या - त्यांच्या क्षेत्रात यश संपादन केलेल्या सर्व व्यक्ती ,खऱ्या अर्थाने परमपूज्य गौतम बुद्ध , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दादासाहेबांचे विचार समाज परिवर्तनासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव ,शहर , वाडी , वस्ती , मोहल्ला इ.ठिकाणचा कार्यकर्ता समाज बंधू भगिनी यांना बहुजन शिक्षण संघाचे सध्याचे कार्यकारी विश्वस्त आणि धम्म यात्रेचे स्वागत आणि सभाअध्यक्ष आद. ॲड. संघराज रूपवते साहेब ,कालकथित दादासाहेब रूपवते यांच्या सहचरणी तुम्हा आम्हा सर्वांच्या आई आद. सुशिलाबाई रुपवते तसेच वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या आद. उत्कर्षाताई रुपवते , बहुजन शिक्षण संघाचे अध्यक्ष आद. बी. आर. कदम सर तसेच बहुजन शिक्षण संघाचे विश्वस्त आद. एम.डी. सोनवणे सर आणि सर्व विश्वस्त मंडळ यांनी केलेले आहे. धम्म यात्रेसाठी धम्म यात्रेचा ग्रामीण विभाग तसेच मुंबई विभाग यांच्या कार्यकारिणीने आपणा सर्वांना येण्याचे आणि ती धम्मयात्रा यशस्वी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे.
ॲड. विकास जगताप सर
मो. 9922876008 / 8999503447
आपणास विनंती आहे की , अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या हक्काच्या -
राजगृह न्युज चॅनलला -
https://rajgriha.in/
युट्युब चॅनेलला -
https://youtube.com/@prof.vikasb.jagtapsir.7282?si=7hRUIOgJNM4lqyLl
फेसबुक पेजला -
https://www.facebook.com/share/18JqJ2BzDU/
व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा -
https://chat.whatsapp.com/HjMw7i3tZZ0K9okXPm9KHi
व्हॉटसॲप चॅनलला -
https://whatsapp.com/channel/0029Vasu8HZIt5s4Z3apXH45
जास्तीत जास्त लोकांनी लोकांपर्यंत
# लाईक करा @
# शेअर करा @
# सबस्क्राईब करा @
कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..