भारत

शतकानुशतके झोळेकर आजही जपतात चिखलातील धूळवड खेळण्याची पऱंपरा

Blog Image
एकूण दृश्ये: 18

शतकानुशतके झोळेकर आजही जपतात चिखलातील धूळवड खेळण्याची पऱंपरा ; वैज्ञानिक आणि मातीशी नाती जपणारा झोळेगावचा होळीचा उत्सव 

     संगमनेर (प्रतिनिधी) 

प्रत्येक गावाला काही ना काही चाली, रीती, रूढी, परंपरा, प्रथा असतात. ह्या रूढी, परंपरा, प्रथा, त्या त्या सण उत्सवाच्या माध्यमातून आणि विविध प्रसंगानुसार आजही अनेक गावे जपताना दिसून येतात. असाच एक अनोखा प्रकार संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील झोळे या गावातील. धुळवडीच्या दिवशी चिखल खेळण्याचा आगळा वेगळा प्रकार झोळे येथील ग्रामस्थ जपतात. 

     मकर संक्रमणातून उन्हाची चाहूल लागते. तर होळीच्या कालावधीत उन्हाची तीव्रता ही अधिक वाढत जाते. ऋतुराज वसंत ऋतूत निसर्गाचे रंग अधिक गडद होतात. सण उत्सवाची रंगत संगत माणुसकीचे नाते वृध्दिंगत करतात असा हा होलीचा उत्सव. होळी, धुळवड आणि रंगपंचमी या त्रिवेणी संगमातून मानवी नात्यांमध्ये रंग भरणारा आणि मानवजातीच्या अंतरंगात डोकावत रसरंग भरणारा, सप्तरंगाची उधळण करणारा हा सण सर्वत्र साजरा केला जातो. 

       झोळे हे गाव नाथ संप्रदायाची परंपरा जपणारे. या गावात आणि पंचक्रोशीत फार पूर्वीपासून गोसावी समाजाची काही घरे होती. याच घरातील काहींनी घेतलेल्या समाधी आजही त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा टिकवून आहेत. नाथ संप्रदायात झोळीला अनन्य साधारण महत्त्व असल्याने भिक्षुकेतून गोसावी समाज आपला उदरनिर्वाह करत असे. झोळीच्या या नाते संबंधाने गावाचे नाव जोडले. किंबहुना त्यावरूनच "झोळे" हे या गावाचे नाव पडले असे काहींचे म्हणणे आहे. परंतु याबाबत सविस्तर माहिती देणारे गावामध्ये आज फारसे वयोवृद्ध माणसे राहिलेलेच नाहीत. 

    गेली कैक वर्ष आणि शतकानुशतकापासून धुळवडीला चिखल खेळण्याची आणि चिखल स्नानाची परंपरा टिकून आहे. धुलिवंदनाच्या शुभमुहूर्तावर चिखल स्नानाची ही अनोखी क्लृप्ती आजही सुरू आहे. प्राचीन काळापासून चालत आलेली ही सणावळीची परंपरा, संस्कृती ,जतन करण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करतात. या चिखलाच्या मातीचा कपाळी टिळा लावून होळीला वंदन करून धुलीवंदन सण साजरा करण्याची निसर्गदत्त आणि वैज्ञानिक कारणाने ओतप्रोत भरलेली आगळी वेगळी परंपरा आजही मोठ्या श्रध्देने साजरी करतांना ग्रामस्थ दिसून येतात. झोळे गावातील प्रत्येक नागरिक, लहान मुले, महिला या धार्मिक उत्सवात सहभागी होतात. झोळे गावातील होळी आणि धुळवड ही वीर पाडवा म्हणून मोठ्या आनंदाने भक्तीभावाने साजरा करण्यात येत असतो.

धुळवडीला झोळे गावात वीर पाडवा साजरा करण्याची अनोखी परंपरा दिसून येते. या दिवशी गाळ खेळण्याची तसेच लहान मुलांना वीर बनविण्याची परंपरा नजरेत भरणारी आहे. झोळे गावचे माजी पोलीस पाटील अण्णासाहेब काळे यांनी या उत्सवाबद्दल माहिती देताना सांगितले की, अनेक वर्षापासून ही परंपरा आजतागायत सुरू आहे. 

----- Advertisements -----

   होळीच्या बाजूला मातीचा बांध घालून गावातील सर्व महिला पुरुष पाण्याचे हेल घेऊन होळीला प्रदक्षिणा घालत असत नंतर बांध तयार करून पाणी टाकले जाते. या बांधात टाकलेल्या पाण्यामुळे गाळ तयार होतो. होळीच्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण गाव होळीचा हा गाळच धुळवडीच्या दिवशी एकमेकाला लावून धुळवडीचा हा उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. याच चिखलात एकमेकांना लोळवले जावून संपूर्ण अंगालाच हा गाळ फसला जातो. भल्या पहाटे चिखल खेळण्याला सुरुवात केली जाते. नंतर एका शेतात जाऊन तिथे कुस्त्याचे फडही रंगले जातात. लहान मुलांचेही कुस्तीचे फड भरतात. तसेच कसरतीचे प्रयोगही या शेतात आजही रंगवल्या जातात. चिखल खेळण्याचा आगळावेगळा प्रकार पूर्वीपासून सुरू आहे. तर रंगपंचमीला होळी नंतर पाचव्या दिवशी रंग खेळला जातो. गावातील लहान मुलांना वीराचे कपडे घालून त्यांना सजवले जाते. वीराचे दर्शन घेऊन आल्यानंतर होळीला प्रदक्षिणा घालतात. सर्व ग्रामस्थ वीराचा पाडवा बघायला येतात. हातात तलवार अथवा काठी घेऊन हो-या, हो-या असं म्हणत विविध वेशभुषेने नटलेले बालक, छोटी, मोठी, मुले धुळवडीचा मनमुराद आनंद घेतात. गावकरी वर्षातून एकदाच वीराचे वीरबाप्पाचे दर्शन घ्यायला जातात. तसेच अधून मधूनही या वीर बाप्पाचे दर्शन ग्रामस्थ घेतात. परंतु ही परंपरा नेमकी कधी आणि कोणी सुरू केली याबाबत आजच्या ग्रामस्थांमध्येही फारसे कोणालाही माहीत नसल्याचे काळे म्हणाले. परंतु या बाबत असा एक कयास बांधता येईल तो असा. होळी आणि झोळी. झोळीवरून झोळे. हे झोळे घेऊन जाणारे वीर बालके अशीच ख्याती तर नाही ना? असा शब्द नि अर्थबोध या गावाशी आपली नाळ तर जोडत नसेल ना ? 

    या चिखल खेळातून शरीर काटक बनते., शरीरावर असलेले त्वचारोग, निसर्ग जलतत्त्व मिश्रीत या माती पासून शरीराला फायदा होतो अशी धारणा झोळेकरांची आहे. हाच चिखल दोघा तिघांनी झोळीत घेऊन एकमेकाला फासण्याचाही प्रकार दिसून येतो. कदाचित झोळीतूनच नेला जाणारा चिखल आणि खेळीमेळीतून माणुसकीचे नाते दृढ व्हावे, गावात चिरंतन स्नेहार्दपूर्ण संबंध टिकावे, ऐकोपा राहावा हा उदात्त हेतूच या धुळवडीच्या खेळातून दिसून येतो. याघटनेचे साधर्म्य गावाशी जोडल्याने कदाचित झोळे हे नाव पडले असावे.

गावातील प्रत्येक लहान मुले , वीराचे कपडे घालून ,वीर बनून वीराचे दर्शन घेऊन या होळीला प्रदक्षिणा घालतात. खरं तर आजची बालके हेच गावाचे आणि देशाचे भविष्य आहे ,भवितव्य आहे. म्हणूनच त्यांच्यावर ह्या सणावाराचे संस्कारही बिंबवले जातात. या वैश्विक भावनेतून गावाचे नाव झोळे तर पडले नसेल ना ? असा समज येथील ग्रामस्थांचा आहे.

    झोळे गावात दोन मारुती असून एक पाहुणा मारुती आहे . या बाबत आख्यायिका अशी सांगतात की, हा मारुती दुसऱ्या गावात बैलगाडीने घेऊन जात असताना बैल गाडीचे चाक तुटले आणि नादुरुस्त झाल्याने पुढे नेताच न आल्याने तो मारूती तिथेच राहिला. नंतर वडाच्या झाडाखाली या मारुतीची काही वर्ष पूजा केली जात असे. परंतु वडाचे झाडही कोसळल्याने ग्रामस्थांच्या सहभागातून या मारुतीची स्थापना करून रंग रंगोटीकरण करून मंदिराची निर्मिती करण्यात आली अशी माहिती अण्णा काळे यांनी दिली. दुसरा एक मारुती आहे. या मारुतीच्या हातामध्ये सोटा आहे. 

    प्रत्येक गावात मारुतीचे मंदिर असतेच. कुठे दास मारूती तर कुठे वीर मारूती असतो. तसेच झोळे गावात दोन मारुतीचे मंदिर असून याच गावात अजून एक वीराचे मंदिर आहे.झोळे गावतील मारूती हा वीर मारूती असून हातात सोटा घेतलेली ही मूर्ती आहे. वीर बाप्पा आणि वीर मारूती हे गावाचे रक्षण करतो अशी धारणा ग्रामस्थांमध्ये दिसून येते. गुण्यागोविंदाने गावातील ज्येष्ठ, अबालवृद्ध महिला भगिनी या सणाचा आनंद घेण्यासाठी पुढाकार घेताना दिसून येतात. धार्मिक परंपरा जपणारे झोळे गावातील वीर बाप्पाचे माहिती दुर्लक्षित होऊ नये या अनुसंगाने वीर बाप्पाचा इतिहास जगाच्या समोर येणे गरजेचे आहे.

----- Advertisements -----

समजूतदारपणा ही जीवनाची खरी शिकवण आहे.

संत तुकाराम
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin