भारत

महिलेची हत्या, एक गंभीर, पठार भाग हादरला ; तिघे अटकेत

Blog Image
एकूण दृश्ये: 403

महिलेची हत्या, एक गंभीर, पठार भाग हादरला ; तिघे अटकेत, न्यायालयाने सुनावली १६ जून पर्यंत पोलीस कोठडी 

       संगमनेर { प्रतिनिधी }

एका महिलेवर धारदार चाकूने हल्ला करत मदतीसाठी धावून आलेल्या दुसऱ्या महिलेवर जबरदस्त मारहाण करत तिलाही गंभीर जखमी केले. या घटनेत एक महिला मृत पावल्याने  संगमनेर तालुक्यासह ग्रामीण  पठार भाग हादरून गेला. हत्या झालेल्या महिलेचे नाव रूपाली ज्ञानदेव वाघ असून मोनिका वाघ असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

      याबाबत हकीकत अशी की, संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथील एका शेतात शौचालयासाठी गेलेल्या महिलेला आपले प्राण गमवावे लागले. या महिलेची चाकूने भोसकून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. याच हल्ल्यात मयत महिलेची ननंद गंभीर जखमी झाली आहे. कर्जुले पठार येथील रहिवासी अजित दादाभाऊ वाघ (वय 25) यांनी घारगाव पोलीसात फिर्याद दिली. 

घरात शौचालय नसल्याने वाघ कुटुंबीय मुरलीधर पडवळ यांच्या शेतात शौचालयासाठी जात असे. मंगळवारी 10 जून सायंकाळच्या सुमारास अजित वाघ यांची वहिनी रूपाली ज्ञानदेव वाघ या शौचालयासाठी पडवळ यांच्या शेतात गेल्या होत्या. त्यावेळी विकास पडवळ तिथे आला आणि त्याने रूपालीस तुम्ही आमच्या शेतात शौचालयासाठी का जाता असे म्हणत शिवीगाळ केली.

----- Advertisements -----

दरम्यान रात्री आठ वाजण्याच्या सुमारात अजित वाघ त्यांचा भाऊ ज्ञानदेव वाघ, वहिनी रूपाली वाघ आणि बहिण मोनिका दादाभाऊ वाघ हे विक्रम पडवळ यांच्या घरी त्यांना समजावून सांगण्यासाठी गेले. त्यावेळी विक्रम पडवळ, मुरलीधर पडवळ आणि अलका पडवळ यांनी या तिघांना शिवीगाळ केली. वाघ कुटुंबीयांनी आमची चूक झाली म्हणत माफी मागतो असे सांगितले. परंतु मुरलीधर पडवळ यांनी जातीवाचक शिवीगाळ केली तसेच संतापलेल्या विक्रम पडवळ यांनी आता तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे म्हणून घरातून चाकू घेऊन आला. अलका पडवळ यांनी रूपाली वाघ यांचे हात धरले आणि विक्रम पडवळने त्यांच्या पोटावर चाकूने वार केले. रूपाली यांना वाचण्यासाठी मोनिका दादाभाऊ वाघ धावल्या असता विक्रम पडवळने त्यांच्यावर चाकूने वार करून जखमी केले. वाघ यांनी रूपाली आणि मोनिका यांना मोटरसायकल वरून  साकूर फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना संगमनेर येथील रुग्णालयात पाठवले. परंतु येथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी लोणी प्रवरा रुग्णालयात पाठवले. प्रवरा रुग्णालयात उपचारा दरम्यान बुधवारी 11 जूनला रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास रूपाली ज्ञानदेव वाघ यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर मोनिका यांच्यावर अद्याप प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी अजित वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरलीधर रामकृष्ण पडवळ, विक्रम मुरलीधर पडवळ आणि अलका विक्रम पडवळ सर्व कर्जूले पठार तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदे, विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात असून १६ जून पर्यंत या तिघांना पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.

----- Advertisements -----

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin