भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव; दादासाहेब रुपवते जन्म शताब्दी सोहळ्याचे आयोजन
संगमनेर प्रतिनिधी
भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आणि कालकथित दादासाहेब रुपवते यांचा जन्म शताब्दी सोहळ्याचे आयोजन बहुजन शिक्षण संघ, पुस्तक मार्केट पब्लिकेशन आणि सुजात फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंतीच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी मालपाणी लॉन्स , कॉलेज रोड , संगमनेर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी स्वागत अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड. संघराज रूपवते तसेच अध्यक्ष म्हणून छत्रपती संभाजीनगरचे सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कवी माजी आमदार लहु कानडे ,प्रमुख पाहुणे म्हणून माजी महसूल मंत्री मा. आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते आदी. मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
सकाळी १०:३० ला गायक विकास भालेराव आणि सहकारी यांचा गायनाचा कार्यक्रम संपन्न होईल. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा होणार आहे. दुपारी ०१:०० वा. भारतीय संविधान आणि आजचे समकालीन वास्तव्य या विषयावर परिसंवाद होणार आहे. यासाठी प्रा.डॉ. सुरेंद्र जोंधळे हे या परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून लाभणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. श्रीरंजन आवटे तसेच प्रा.डॉ. मिलिंद कसबे व प्रा.डॉ. राहुल गोंगे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून दरम्यान स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे .
![]()
दुपारी 2 नंतर कालकथित दादासाहेब रुपवते कार्यकर्ता सन्मान पुरस्कार वितरण होणार आहे. अशी माहिती संयोजक भारतीय संविधान अमृत महोत्सव समिती दादासाहेब रुपवते जन्म शताब्दी सोहळा समितीने दिली आहे. तसेच या कार्यक्रमासाठी पुरोगामी चळवळीतील तसेच फुले - शाहू - आंबेडकर विचाराच्या कार्यकर्त्यांनी आणि संविधानावर प्रेम करणाऱ्या संविधानवादी लोकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महोत्सव समितीच्या संयोजकांकडून करण्यात आले आहे.