विरक्त लोकांच्या वास्तव्यासाठी प्रवराकाठ पवित्र भूमी ; प. पू. आचार्य श्री मोठेबाबा [ चंदनापूरीत चातुर्मासातल्या शेवटच्या टप्प्याचे आयोजन ] अमृतवाहिनीच्या काठावर अमृतवाणीने महिनाभर चालणार सत्संग
संगमनेर { प्रतिनिधी }
पेमगिरी, धांदरफळ, कळसूबाई, धरण क्षेत्राचा परिसर हा विरक्त लोकांना आटन करण्यासाठी चांगला आहे. आपली इच्छा असून उपयोग होत नाही. त्यासाठी योगायोग यावा लागतो, घडावा लागतो. भगवंतांच्या इच्छेनुसार सर्व काही घडत असतं. भगवंत जसे फिरवतो तसेच आपणास फिरावे लगते आटन करावे लागते. जसे वर्तन करून घेतो तसेच वर्तन करावे लागते. पूर्वी सर्व सामान्य परिस्थिती होती. कौलारू घर होती. आता आरसीसीचे इमले तयार झालेले आहे. पूर्वीची माणसे संवेदनशील होती. काळ बदलत गेला. परंतु कितीही बदल झाला, कितीही भौतिकता आली, अथवा संपन्नता आली असली तरी संवेदनशील माणसे तशीच राहतात असे मौलिक विचार पूज्य प. म. सर्वविंद आचार्य प्रवर श्री मोठेबाबा यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील चंदनापुरी येथील सर्वज्ञ नगर, शिरापूर परिसरात महानुभाव पंथीयांचा भव्य सत्संग सोहळा आणि चातुर्मासातला शेवटचा टप्पा या ठिकाणी संपन्न होत आहे. आचार्य प्रवर श्री मोठेबाबा पुढे म्हणाले की, मानवातील नम्रता, सौज्जन्यता, आणि धर्माबद्दलची जी प्रीती आहे ती कायमच आहे. हीच दैवी देणगी आहे. संपन्नता आल्यानंतर माणसे बदलतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली. परंतु भगवंताच्या कृपेने भविष्यात सर्व काही चांगले होईल असे सुतोवाच त्यांनी केली.
विरक्त लोकांना कशाचीही गरज नसते ,परंतु प्रवास ( आटण) करत असताना भिक्षेसाठी एखादे गाव पाहिजे असे ते म्हणाले. मानवाची व्यावहारिक आणि भौतिक प्रगती झालेली आहे. परंतु परमार्थ मार्गावरील आध्यात्मिक उन्नती होणे गरजेचे आहे. मानवी जीवनात योगाशिवाय काही घडत नसते असेही ते म्हणाले.
मोठेबाबांच्या या सत्संगात तब्बल तींन हजार साधू, महंतासह संगमनेर अकोले तालुका आणि पंचक्रोशीतील महानुभाव पंथातील हजारोच्या संख्येने भक्तगण या ठिकाणी श्रवणाचा लाभ घेत आहेत. विजय रहाणे, आनंदा रहाणे, संदीप रहाणे,राहुल वालझाडे, शामभाऊ दिवटे, दत्ताभाऊ कांगणे, हरीश लांडगे संदीप लांडगे अशोक लांडगे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केलेले आहे. यामध्ये एक महिन्याची भोजन आणि निवासाची व्यवस्था केलेली आहे. या सोहळ्याचा शुभारंभ बुधवार तिथी २६ मार्चला हजारो महानुभाव भक्तगणांच्या उपस्थितीने झाला आहे. आचार्य प्रवर श्री मोठेबाबा अंकुलनेरकर हे एक मास निवासी राहणार असून पोथी, प्रवचन, दैनंदिन दिनचर्या, सत्संग, पूजापाठ, श्री चक्रधर स्वामींच्या उपदेशाचे चिंतन होणार आहे. साधुसंताच्या दर्शना सोबत ज्ञान प्रबोधन श्रवण अशा अनेक कार्यक्रमाचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. श्री चक्रधर स्वामींच्या कृपेने चंदनापुरी गावात सर्वांच्या मंगलमय उपस्थितीने हे धार्मिक कार्य पार पडत आहे. आचार्य प्रवण परमपूज्य श्री मोठेबाबा जाधववाडी चक्रधर स्वामींचे वचने या मासामध्ये भक्तगणांना अवगत केले जाणार आहे. भाविक भक्तांनी या पर्वणीचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले स्वागत
गुरुवर्य प पू आचार्य श्री मोठेबाबाजी यांचे स्वागत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. तसेच आलेल्या सर्व संतमंडळी आणि भक्तगणाच्या स्वागतासाठी सदरचे कार्यस्थळ सुसज्ज झाले असून या सत्संग सोहळ्याच्या पूर्वतयारीची पाहणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली असून यावेळी थोरातांनी या सोहळ्याच्या नियोजनाविषयी आयोजकांशी चर्चा केली.