महिला कृष्णा सारडाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला ; पाच लाखाची मागतली होती खंडणी
संगमनेर प्रतिनिधी
बदनामी करण्याच्या उद्देशाने साखरपुड्याचे जुने फोटो व्हायरल करून त्या बदल्यात पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी एका महिलेसह अन्य दोघा विरोधात गेल्या महिन्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील महिला आरोपी कृष्णा सारडा हिचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यामुळे खंडणी प्रकरणातील आरोपींच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. यू ट्यूब चालक महिला कृष्णा अजित सारडा अशोक चौक, गोविंद नागरे नेहरू चौक, आणि ओंकार राऊत घुलेवाडी सर्व संगमनेर अशी खंडणी प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.शहरातील एक तरुणी आणि सामाजिक कार्यकर्त्याची बदनामी होईल त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन संपुष्टात येईल असे माहीत असताना देखिल तिघा जणांनी त्यांच्या जुन्या साखरपुड्याच्या फोटोचा दुरुपयोग करून आरोपींनी फोटो व्हायरल करून तुमची बातमीतून बदनामी करू अशी धमकी देऊन त्याबदल्यात सामाजिक कार्यकर्त्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती.त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने फिर्यादी तरुणी आणि साक्षीदाराचा एकत्रित फोटो सामाजिक माध्यमांमध्ये व्हायरल केला. त्यानंतर आरोपी महिला कृष्णा सारडा हिने सामाजिक कार्यकर्त्याला फिर्यादी तरुणीने लग्न केले असून लग्नाचे फोटो माझ्याकडे आहे. या संदर्भातील बातमी न्यूज चॅनेलवर द्यायची नसेल तर पाच लाख रुपयांची मागणी केली होती. खंडणी मागितल्याने संतापलेल्या तरुणीने शहर पोलीसात धाव घेतली. दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कृष्णा सारडासह दोघाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५६ (२), ३०८ (२), ३०८(३) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान यातील आरोपी कृष्णा सारडा हिने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्यासमोर या अर्जाची सुनावणी झाली.सुनावणी दरम्यान सरकार पक्षाचे सहाय्यक सरकारी वकील प्रमोद वाघ यांनी या मागील सर्व घटनाक्रम न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत सखोल तपासासाठी आरोपीच्या कस्टडीची आवश्यकता असल्याची मागणी केली. आरोपी गोविंद नागरे,, ओंकार राऊत या दोघांनी संगणमत करून फिर्यादी व साक्षीदाराचे साखरपुड्याचे फोटो अर्जदार आरोपी कृष्णा सारडा हिला दिला असल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. आरोपी पोलिसांना सहकार्य करत नाही. याशिवाय अन्य महत्त्वाच्या बाबीही सरकारी वकील वाघ यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. सहाय्यक सरकारी वकील वाघ आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा न्यायाधीश डी एस घुमरे यांनी आरोपी महिला कृष्णा सारडा हिचा जामीन अर्ज नामंजूर केला. अटकपूर्व जामीनासाठी आरोपीला आता उच्च न्यायालयात जावे लागणार आहे.