*मोडी लिपी परीक्षेत भारत पडवळ उत्तीर्ण* *परिसरात होतय कौतूहल*
संगमनेर { प्रतिनिधी } शासनाच्या पुरातत्व विभाग पुणे, तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव ढमढेरे कला, वाणिज्य विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहा दिवसांची मोडीलिपी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. प्रशिक्षणा नंतर घेतलेल्या परीक्षेत ८८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यापैकी ६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या परीक्षेत पत्रकार भारत पडवळ तृतीय श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले. सदर प्रशिक्षणासाठी परभणी, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, अलिबाग, राजगुरूनगर , आंबेगाव, मंचरसह विविध विभागातील, वकिल, शिक्षक विद्यार्थी तसेच इतिहास जाणून घेण्याची आवड असणारे ८८ जण सहभागी झाले होते. यादव कालापासून मोडी लिपीचा वापर सन १९६० पर्यंत चालू होता. त्यानंतर शासनाने मोडी लिपी शालेय अभ्यासक्रमातून बंद केली. मोडी लिपीमध्ये लिहिलेला इतिहास नवीन पिढीसमोर येणे आवश्यक आहे. त्यातच मोडी वाचक दुर्मीळ झाल्याने दडलेल्या इतिहासाचा खरा अभ्यास होणे आवश्यक आहे. सध्या केवळ कुणबी नोंद शोधण्यासाठीच जनतेमध्ये मोडी शब्दाचा अर्थ प्रचलित आहे. सध्याच्या काळात तरूणांनी शिक्षणाबरोबरच मोडीलिपी अवगत केल्यास इतिहास संशोधनाला हात भार लागेल. भारत पडवळ हे वयाच्या ५३ व्या वर्षी मोडी लिपी परीक्षा देवून उत्तीर्ण झाल्याने तालुक्यातील जनतेला मोडी वाचनासाठी त्यांची मदत होणार आहे.