भारत

120 वर्षांपासून सुरू आहे विजय रथोत्सवाची परंपरा ;

Blog Image
एकूण दृश्ये: 9

संगमनेर मध्ये पूर्वी पुरूषच ओढत होते हनुमानाचा रथ ; 96 वर्षां पासून महिला ओढतात रथ ; 120 वर्षांपासून सुरू आहे विजय रथोत्सवाची परंपरा ; रथोत्सवाला करावा लागला विविध अडचणींचा सामना; रथासह उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी शहरवासीयां समोर आहे मोठे आव्हान   संगमनेर भारत रेघाटेमहाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्या संगमनेर शहराचा धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा फार जुना आहे. आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत अडकला होता, तेव्हा युवावर्गापासून वृद्धांपर्यंत आणि महिलांनीही या देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. यातील काही आठवणी इतिहासाच्या पानात कोरल्या गेल्या, तर काही काळाच्या ओघात नष्ट झाल्या तर काही गौरवशालीही झाल्यात. पुण्यात महात्मा जोतिबा फुले, बाळ गंगाधर टिळकांनी ज्या प्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा आरंभ केला. समाजातील लोकांना इंग्रजांविरुद्ध संघटित करण्यासाठी या परंपरेचा जागर तेवत ठेवला. तसाच जागर संगमनेर मध्येही काही लोकांनी महाबली हनुमान जयंतीला रथोत्सवातून परंपरेचा पाया घातला. परंतु स्वातंत्र्याचा हा पाया खिळखिळा करण्याचे काम इंग्रज सरकारने केले.     संगमनेरचा रथोत्सव हा इंग्रजांच्या जुलमी सत्तेच्या विरोधातील बुलंद आवाज होता. या रथोत्सवास अनेकदा खंडित करण्याचा प्रयत्नही केला गेला, मात्र संगमनेरच्या काही रणरागिणी महिलांनी ब्रिटीश अधिकार्‍यांना कडाडून विरोध करून या रथोत्सवाची कमान स्वत:च्या हातात घेतली ती भू- मातेच्या स्वाभिमाना साठीच. अन सुरू झाली विजय रथोत्सवाची परंपरा. आजही ती तेवढ्याच ताकदीने सुरू आहे. आणि राहणार आहे यात शंका नाही.       संगमनेर शहरातील प्रवरा म्हाळुंगी नदीच्या संगमावर दिमाखात वसलेले अनेक मंदिरे आहेत. एक प्रकारे मंदिरांचे गाव म्हणूनच अशी ख्याती या गावास आहे. चंद्रशेखर चौकातील प्रसिद्ध श्रीराम, हनुमान मंदिर आजही लोकांच्या आत्मिक, धार्मिक श्रद्धेचे केंद्र बनलेले आहे. गावातील लोक कोणताही शुभारंभ करण्यापूर्वी येथील पूज्य ग्राम देवतेचा आशीर्वाद घेतात. ब्रिटिश राजवटीचा काळ फार बिकट होता. इंग्रजांच्या विरोधात जनतेला एकत्र करण्यासाठी महात्मा जोतिबा फुले, बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केली. याच प्रेरणेने चंद्रशेखर चौक, वाडेकर गल्ली, ब्राह्मण गल्ली, खंडोबा गल्ली, सुतार गल्ली, रंगार गल्ली आदि भागातील काही तरुणांनी एकजुटीने श्री हनुमान जयंती निमित्त शहरात रथाची मिरवणूक काढण्यास सुरुवात केली. याच मिरवणुकीत संपूर्ण संगमनेरकर जय श्रीराम, बजरंग बली की जय या घोषणा देत संपूर्ण परिसर दुमदुमून टाकत असत. समर्थ रामदास स्वामींना मारुती बलोपासनेचे महत्त्व माहीत होते. त्याचा परिपाक म्हणून संगमनेर मध्येही हनुमान जयंतीला निघालेल्या या रथोत्सवाच्या मिरवणुकीने लोकांमध्ये नवी ऊर्जा संचारली आणि लोक आपापल्या परीने दरवर्षी या उत्सवात गावकी भावकी न आणता, राजकारण विरहीत आपापले योगदान देऊ लागले. 1905 मध्ये 20 फुटी मनोरथ पूर्ण करणारा रथ तयार झाला ; अन प्रथमच श्री हनुमान याच रथात आरूढ झाले*_ 1901 ते 1905 या काळात नामदेव आणि सुंदर खरे या सुतार बांधवांनी हा रथ तयार केला. संगमनेर शहरातील शिल्पकार नामदेव खरे आणि त्यांचे बंधू सुंदर खरे (मिस्त्री) या बंधूव्दयांनी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीसाठी विनामूल्य रथ देण्याचा प्रस्ताव ग्राम उत्सव समिती समोर ठेवला, गाव उत्सव समितीने तो प्रस्ताव आनंदाने स्वीकारला. 1901 ते 1905 मध्ये खरे बंधूंनी मलबार सागवान लाकडापासून 20 फूट अर्थात एक ते दीड मजली उंच रथ बनविण्यास सुरुवात केली. तो 1905 मध्ये पूर्ण बनवून तयार झाला. या रथावर एकीकडे शौर्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराज , तर दुसरीकडे महात्मा गांधीं यांचा शांतीचा संदेश देणारी नक्शीकाम केलेल्या तीन फूट कोरीव मूर्ती आहेत. या सोबतच खरे बंधूंनी हनुमानजींची तीन फुटांची भक्त स्वरूपमूर्ती तयार केली. या रथाला चार चाके आहेत. मागची दोन चाके मोठी आणि पुढची दोन लहान चाके आहेत. या रथाला बेअरिंग जॉग देखील बसविण्यात आला आहे. जेणेकरून रथ रस्त्यांच्या वळणावर सहज वळू शकेल. तसेच,चाकांमध्ये बेअरिंग्ज बसवण्यात आल्या आहेत. जेणेकरून रथ ओढणाऱ्यांना जास्त ताकद लावावी लागणार नाही.आजमितीस या रथाला 120 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1905 मध्ये प्रथमच श्री हनुमान याच रथात आरूढ झाले. रथोत्सवास सुरूवात झाली आता त्यास 120 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेकदा संकटाचा केला सामना 120 वर्षाच्या उत्सवा दरम्यान या रथाने अनेक संकटाचा सामना केला. रथाची चाके अनेकदा वाटेत, नाल्यात अडकली, बलोपासक असलेल्या तरुणांनी ती बाहेर काढली, 50 वर्षांनंतर दरम्यान या रथाची दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर या रथाच्या दुरुस्तीची गरज आजतागायत भासलेली नाही. हनुमान जयंतीला चंद्रशेखर चौकातून पूर्वापार मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत संपूर्ण संगमनेरवासी सहभागी होतात. ही अभूतपूर्व गर्दी आणि लोकांचा उत्साह पाहून ब्रिटिश प्रशासनाचे हृदय हेलावले. ब्रिटिश प्रशासनाने या रथोत्सवावर बंदी घातली, परंतु तरीही हनुमान जयंतीला रथयात्रा काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. खूप संघर्ष झाला. अनेकांवर अत्याचार झाले, लोकांना पकडून तुरुंगात टाकण्यात आले, मारहाण करण्यात आली, तरीही या रथोत्सवाची परंपरा पाळली गेली. लाकडी मूर्ती केली जप्त 17 एप्रिल 1927 रोजी हनुमान जयंतीला रथ काढण्याची तयारी सुरू झाली. यात्रेला सुरुवात होऊन रथ संगमनेर येथील सोमेश्वर मंदिरात पोहोचला. याठिकाणी पोलिसांनी रथ थांबवून रथाचा मार्ग बदलण्यास सांगितले, मात्र एकदा पुढे गेलेला रथ परत आणणे धार्मिक परंपरेच्या विरोधात असल्याने पोलीस आणि हनुमान भक्तांमध्ये संघर्ष झाला. चार-पाच दिवस रथ तिथेच उभा होता. हनुमान भक्त तिथे जावून पूजा करत राहिले. अखेर 22 एप्रिल 1927 रोजी रथ पोलीस बंदोबस्तात भडंग बाबा मस्जिद मार्गावरून जात असताना विरोध झाला. नंतर रथ मिरवून पुन्हा मंदिरात आणण्यात आला. पुन्हा दोन वर्षानंतर 5 एप्रिल 1929 रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी पोलीस प्रशासनाने शहरात 144 कलम लागू केले. 1927 ते 1929 या काळात रथोत्सवावर दोन वर्ष कडक बंदी घालण्यात आली. तरीही रथयात्रा काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र हनुमान भक्तांना अपयशाला सामोरे जावे लागले. तत्कालीन प्रशासनाने रथोत्सवावर तर बंदीच घातली .एवढेच नव्हे तर हनुमानजींची लाकडी मूर्तीही जप्त केली. __*रणरागिणी महिलांनी हाती घेतली रथोत्सवाची दोरी_ 1929 साली रणशूर झुंबराबाई औसक (अवसक) यांनी हनुमान जयंतीला रथयात्रेचा पुढाकार घेतला. झुंबराबाईने शूर महिलांची फौज तयार केली आणि रथात हनुमानाचे चित्र ठेवून श्री हनुमान जयंती रथोत्सवाची तयारी सुरू केली. ही तयारी पाहून ब्रिटिश प्रशासनानेही रथयात्रा रोखण्यासाठी संपूर्ण फौजफाटा तैनात केला. मग तो दिवस आला आणि वेळ आली, ज्याची इतिहासात नोंद झाली. तो क्षण होता संगमनेर मधील स्वातंत्र्य संग्रामाचा. ब्रिटिश फौजदाराने रथ थांबवला झुंबराबाईने हनुमानजींचे चित्र रथात ठेवले. नियमा नुसार पूजा झाली. कारण श्री हनुमानजींची लाकडी मूर्ती अजूनही इंग्रजांच्या ताब्यात होती. झुंबराबाई औसक तिच्या सोबत असलेल्या शेकडो दबंग महिला सेना हा हनुमानाचा रथ ओढत होत्या. त्यामध्ये बंकाबाई परदेशी, लीलाबाई पिंगळे (मोरोपंत पिगले यांचे वंशज). सोनूबाई तांबे, बस्सीबाई ढोरे, गजीबाई पोकळे, ठकूबाई बुरसे या महिलासह शे सव्वाशे महिला अ्ग्रभागी होत्या. चंद्रशेखर चौकातून रथ बाहेर येताच इंग्रज फौजदाराने रथासमोर उभे राहून रथ थांबवला. फौजदाराने रथ थांबवताच रथात सामील असलेल्या महिलांनी इंग्रज सैनिकांवर नारळ, दगड, हळद, सुपारी हातात जे काही होते ते घेऊन हल्ला केला. अधिका-यांना पळून लावले.   *_पोलिस अधिका-यांना देण्यात येऊ लागला सन्मान*_ इंग्रजांनी सामंजस्याचा हात पुढे केला. महिलांचा उत्साह आणि जोश पाहून इंग्रज सरकारला समेट करणेच योग्य वाटले. ब्रिटीश प्रशासनानेही हनुमानजींची लाकडी मूर्ती पूर्ण सन्मानाने झुंबराबाईला परत केली. इंग्रजांच्या या नरमाईनंतर प्रशासनाचे सहकार्य मिळत असताना रथोत्सवाच्या पहिल्या पूजेचा मानही प्रशासकीय अधिकाऱ्याला द्यावा असा निर्णयही घेण्यात आला. आणि अखेर विजय रथोत्सव संपन्न झाला. तेव्हा पासून या उत्सवात पोलिस अधिकारी यांना हा मान देण्यात येऊ लागला. पोलिसांचा बँडही सहभागी होऊ लागला. _*झुंबराबाई बद्दल आदर*_ 1929 पासून श्री हनुमान जयंती रथोत्सवाची कमान झुंबराबाई औसक ( अवसक) यांच्याकडे आली. दरवर्षी सर्वात प्रथम झुंबराबाईचा प्रशासनातर्फे साडी, चोळी, बांगड्या, श्रीफळ देऊन सत्कार करून विजयी रथाची सुरुवात करीत असत.  *कोण होती झुंबराबाई*?झुंबराबाईच्या सासऱ्यांचे पूर्वज लातूर तालुका निलंगा औसा गावातील. हे कुटुंब संगमनेरला स्थायिक झाले आणि औसा गावातील असल्याने औसेकर नावाने परिचित झाले. पुढे औसक अवसक झाले. (झुंबराबाई भांबारे चे माहेर जुन्नर जि. पुणे येथील रहिवासी) झुंबराबाईचा मुलगा दत्तात्रेय औसक आणि मुलगी सावित्री औसक , तर पुढच्या पिढीत झुंबराबाईची 7 नातवंडे म्हणजे माधव, विलास, कैलास, रुक्मिणी, कमल, गुलाबबाई. आज त्यामध्ये लक्ष्मी हयात नाही. _*कोविडमुळे रथोत्सवाची परंपरा पुन्हा खंडित झाली होती *_ समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ विधिज्ञ श्रीराम गणपुले सांगतात की, 2019- 20 मध्ये कोविड महामारीमुळे हनुमान जयंती विजय रथोत्सवाची परंपरा पुन्हा एकदा खंडित झाली होती, 2022 ला पुन्हा एकदा विजय रथोत्सव सुरू झाला. योगायोग शनिवार 16 एप्रिल 2022 रोजी पुन्हा एकदा महिलांनी श्री हनुमान जयंतीचा विजयी रथ ओढला. ही परंपरा भविष्यात कधीही खंडित होऊ नये अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. गणपुले म्हणाले की, गतवर्षी श्री रामनवमी-श्री हनुमान जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यामध्ये सोमनाथ पराई हे अध्यक्ष होते. यासोबतच समितीमध्ये 11 सदस्यांची नियुक्ती केली होती.  _*समितीने दक्षता घ्यावी*_ श्रीराम नवमी आणि हनुमान जयंती महोत्सवासाठीव र्षागणिक समितीची नेमणूक केल्या जाते. उत्सवावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी समितीने कर्तव्यदक्ष राहावे अशा सूचना नागरिकांमधून येत आहेत.  _*रथोत्सवाला योगदान देणारे वंशज*_ झुंबराबाईच्या धाडसाचे साक्षीदार असलेल्या संगमनेरच्या ८५ वर्षीय भागीरथी ढोरे सांगतात की, झुंबराबाई खूप धाडसी स्त्री होती. इंग्रज अधिकारी तिला चांगलेच घाबरले आणि तिचा आदरही करत. झुंबराबाईचे वंशज आजही संगमनेरमध्ये राहतात आणि विविध व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करून जीवन कंठत आहेत. तसेच बंकाबाई परदेशी यांचे वंशज आजही संगमनेर व नाशिक येथे राहतात. लीलाबाई पिंगळे (मोरोपंत पिगले यांचे वंशज). पिंगळे कुटुंबातील कोणीही आता संगमनेरमध्ये राहत नाही. सोनूबाई तांबे, बस्सीबाई ढोरे, गजीबाई पोकळे, ठकूबाई बुरसे यांचे वंशजही संगमनेरमध्ये राहतात. _*खरे परिवार व झुंबराबाई यांच्या वंशजांनी व्यक्त केली नाराजी*_ इंग्रजांना धैर्याने तोंड देणाऱ्या झुंबराबाईं या धाडसी महिलांच्या पाठिंब्याने महाबली हनुमान जयंती रथोत्सवाची खंडित झालेली परंपरा पुनरुज्जीवित केली, झुंबराबाई आणि तिच्या कुटुंबीयांना कालांतराने दुर्लक्षित व्हावे लागले. आजही श्री हनुमान जयंतीला विजय रथाची मिरवणूक काढली जाते, पण आज ना खरे आणि झुंबराबाईच्या वंशजांची आठवण होते ना त्यांच्या वंशजांना या मिरवणुकीत बोलावले जाते. आज झुंबराबाईचे वंशज छोटे-मोठे व्यवसाय करून कसरतीचे जीवन जगत आहेत. झुंबराबाई यांच्या नंतर औसक अवसक कुटुंब आणि रथाचे शिल्पकार खरे कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याने दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. रथपूजेचे निमंत्रण देऊन रथाचे व्यवस्थित जतन संवर्धन करावे तसेच या रथाचे पावित्र आणि मजबूतपणा कायम टिकण्यासाठी गरजेपेक्षा कोणत्याही व्यक्तीला रथावर चढू देऊ नये, बसू देऊ नये कारण या रथात मारूतीराया विराजमान झालेले असतात. सभोवतीच्या गराड्यामुळे मारूतीचे दर्शन पण नीट होत नाही. रथावर चढणारे मारूती रायाकडे पाठ करून फोटो सेशन मध्ये मुश्किल असतात. यास कुठे तरी मर्यादा आली पाहिजे प्रतिबंध झाला पाहिजे अशी खंत आप्पासाहेब खरे आणि परिवारंनी व्यक्त केली. *_पुरूषांनीच ओढला 21 वर्ष रथ_* 1905 ते 1926 या काळात हनुमान जयंती निमित्त पुरुषवर्ग हा रथ ओढत असत परंतु आपला देश ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली असल्याने ब्रिटीश अधिकाऱ्यांनी रथ ओढण्यापासून पुरुषांना मनाई केली. रथ परंपरेवर बंदी घालण्यासाठी इंग्रजांनी अनेक प्रयत्न केले. पण रथ ओढण्याचा प्रयत्न केला गेलाच त्याचा फारसा उपयोग झाला नाही.  _*सलग दोन वर्ष आणली ब़ंदी*_ गावातील नागरिकांनी रथ ओढण्याचा प्रयत्न केला असता ब्रिटिश सरकारने तो रोखला 1927-29 या दोन वर्षांची बंदी आणली. आणि रथ तेथेच सोडून रथाची पूजा केली गेली. . सोमेश्वर मंदिराजवळ रथ थांबला, त्यानंतर पुन्हा एकदा रंगार गल्ली येथे असाच प्रयत्न करण्यात आला. काही दिवस पूजेनंतर गावात रथ मिरवून रथ परत मंदिरात नेण्यात आला. उत्सवासाठी नागरिक एकत्र आले आणि एक प्रचंड आंदोलन उभे राहिले ज्यामुळे इंग्रज घाबरले. कारण ही घटना स्वातंत्र चळवळीचा एक भाग होता. 1927 -1929 मध्ये या उत्सवावर पुन्हा बंदी घालण्यात आली. दरम्यान ब्रिटीश पोलीस एका मुलाला अटक करण्याच्या इराद्याने व्यस्त होते. तुम्ही पुरुषांना विरोध करू शकता ? महिलांना नाही! अशी भूमिका महिलांनी घेतली. यावर ब्रिटीश अधिकारी हतबल झाले. ब्रिटीशांना पटवून देण्याच्या प्रयत्नात आठरा पगड जातीतील महिलांनी हा रथ पुढे चालवला. ही परंपरा आजही जपली जात आहे.  *_तो छबिना नाही! आकर्षक फटाक्याची आतषबाजी_* 35 -40 वर्षा पूर्वी रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत हनुमान जयंतीला छबिना निघत असे हनुमानजींचे मंत्रोच्चार आरती, सामाजिक प्रबोधन, धार्मिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यासाठी रात्री 8 ते 10 या वेळेत रथावर विद्युत रोषणाई, दीपोत्सव करून छबिना निघत असे. त्या दरम्यान काही अनुचित घटनेमुळे गेली 35 -40 वर्षांपासून छबिना काढण्याची प्रथा बंद पडली आहे. रथयात्रेनंतर आता सायंकाळी सात नंतर दारूच्या शोभेच्या विविधरंगी आकर्षक अशा फटाक्याच्या आतषबाजीने नागरिकांचे मनोरंजन केल्या जाते.  *_120 वर्षाच्या रथ कारकीर्दीवर यांनी टाकला प्रकाशझोत__* संगमनेर नगरपालिकेने 22 ऑक्टोबर 1962 रोजी प्रकाशित केलेल्या शताब्दी विशेषांकात हनुमान जयंती आणि रथ उत्सवावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला. यामध्ये डॉ. आ. ग. गाडगे, श्री बाबुराव ढोले, कृ. सी. मराठे, शंकरराव जोशी, भाऊसाहेब जाजू, ज. न. मणियार, व. ग. देशपांडे, य. वि, हडप, डी. बी राठी, तलवार प्रेस चे प्रभाकर यादवराव सरोदे, आप्पासाहेब खरे, डॉ. संतोष खेडलेकर, पत्रकार शाम तिवारी, विलास गुंजाळ , गौतम गायकवाड, अनंत पागारकर, सुनील नवले, दैनिक भास्कर, सकाळ, लोकसत्ता, लोकमत, सामना, पुण्यनगरी, दिव्य मराठी, स्थानिक दैनिक आनंद, नायक, युवावार्ता, प्रवरातीर, प्रजा, प्रवरेचे पाणी अशा अनेक वृत्तपत्रांनी या घटनाक्रमावर वेळोवेळी लेख आणि बातमीतून प्रकाशझोत टाकला.  *_12 एप्रिल 2025 ला महोत्सवाला लागले गालबोट*_* रथोत्सवा दरम्यान दोन गटांमध्ये वाद झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला ; -- जेव्हा महिलांनी रथ ओढण्याचा प्रयत्न केला आणि मिरवणुकीतील ढोलकी वाजवणाऱ्यांना ढोलकी वाजवण्यापासून रोखले तेव्हा रथ पुढे जाऊ शकला नाही. ढोल पथक आणि अन्य काही कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. दोघांमध्ये हाणामारीही झाली. या वादाचे पर्यवसान धक्काबुक्की आणि मारहाणी पर्यंत झाले. या घटनेला पोलिस निरीक्षक राहुल देशमुख आणि पोलीस पथकाने वेळीच आवर घातल्याने अनर्थ टळला. 120 वर्षांच्या या धार्मिक रथोत्सवालाही ग्रहण लागले.  *_रात्रीच्या आगीने संगमनेर मध्ये नागरिकाची उडाली तारांबळ_* चंद्रशेखर चौकात सायंकाळी 7 वाजता या ठिकाणी दारूच्या फटाक्यांची विविध रंगीबेरंगी आकर्षक अशी आतषबाजी करण्यात आली. ही आतषबाजी बघण्यासाठी तोबा गर्दी जमली झाली. ही आतषबाजी सुरू असतानाच चौकातील एका घरावर फटाका पडल्याने परशरामी यांच्या जुन्या घरावर वाळलेल्या गवताने लगेच पेट घेतला. धुराच्या लोळाकडे बघ्यापैकी काहीचे लक्ष गेले. घराच्या वरबाजुला आग पसरल्याने सर्वत्र धूर दिसायला लागल्याने नागरिकांमध्ये आग लागल्याच्या चर्चेला चांगलेच उधान आले . एवढ्यात आग लागली ! आग लागली !असा आक्रोश करीत नागरिकांची चांगलीच धावपळ झाल्याने त्या ठिकाणी एकच तारांबळ उडाली. दरम्यान संगमनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करताच तात्काळ अग्निशमन दल त्या ठिकाणी हजरही झाले खरे ! परंतु, रस्त्याच्या मधोमध आडव्या तिरक्या लावलेल्या दुखाची, चार चाकी गाड्याने अग्निशमन दलास चांगलाच अडथळा निर्माण झाला. तोपर्यंत परसरामी यांच्या घरावरील वाळलेले गवत जळून खाक झाले होते. त्यातच या ठिकाणी लागलेली आग विजण्यासाठी युवकांनी शर्तीचे प्रयत्न केले. पुरोहित संघाचे भाऊ जाखडी म्हणाले की, पालिकेचे अग्निशमनही तत्पर दाखल झाले. पुढील दक्षता लक्षात घेत आग  अटोक्यात यावी यासाठी फायर ब्रिगेडने प्रयत्नही केला. परंतु तोपर्यंत आग पूर्णत; विझल्याचे लक्षात आले. विशेष दक्षता म्हणून संगमनेर नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाने या ठिकाणी पाण्याचा फवारा मारला. भविष्यात अशीच एखादी दुर्घटना घडू नये म्हणून अग्निशमन दलास आधीच पाचारण करून ठेवले पाहिजे अशी चर्चा तिथै रंगली. अन एकदाचे संकट टळले म्हणत हु $ श्य करीत नागरिक भक्त गणांची पावले मात्र भंडा-याच्या दिशेने वळाली .  _*सर्वांचा लाभतो सहयोग*_ या उत्सवामध्ये शहरातील तमाम नागरिकांसह, श्रीराम नवमी व हनुमान उत्सव समिती चे अध्यक्ष कमलाकर भालेकर योगीराज परदेशी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी यांचेही मोलाचे योगदान लाभत असते. *_संगमनेरचा ग्रामोत्सव रथोत्सव एकात्मतेचे प्रतीक_* दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर संगमनेर शहर, तालुका पंचक्रोशी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भक्तगण हा रथोत्सव पहावयास येतात. भल्या पहाटे मारुतीरायाला श्रीरामाला अभिषेक करून पूजा अर्चा आणि महाआरती करून रथ उत्सवाला पोलीस अधिकाऱ्यांनी झेंडा दाखवताच रणरागिणी महिला हा रथ ओढण्यास सुरुवात करतात. या उत्सवामध्ये लहान बालकासह अबाल वृद्ध महिला, युवा, युवती, मोठ्या संख्येने सहभागी होत या रथ उत्सवाचा आनंद घेतात.पारंपारिक आणि जुने साहित्य त्यामध्ये मुद्गल वेताची पातळ काठी, सनई चौघडा, ढोल ताशा, लेझीम पथक, व्दंदयुध्द, बाल वारकरी, मर्दानी खेळातून ही मिरवणूक रोमहर्षक होत जाते. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या डॉक्टर जयश्री थोरात, विद्यमान आमदार अमोल खताळ, नीलम खताळ, तमाम नागरिक आणि भक्तगणांना शुभेच्छा देऊन या महोत्सवा मध्ये आपला सहभाग घेत आनंद द्विगणित करतात.  _*असा धार्मिक ठेवा महाराष्ट्रात कुठेही नाही, एक व्हा ! रथ टिकवा ! :- अर्टिस्ट प्रमोद कांबळे*_अनेक शहरात आणि गावात धार्मिक ऐतिहासिक ठेवे असतात. परंतु संगमनेर शहरातील रथोत्सवाचा धार्मिक ठेवा इतर शहराच्या तुलनेत अनमोल आहे. या रथ उत्सवात पक्ष विरहित ग्रामस्थांनी एक होवून रथ आणि उत्सव टिकवण्यासाठी पुढे आले पाहिजे. शिल्पकार खऱे यांच्या पूर्वजांचे आणि पिढीचे योगदान फार मोठे आहे. त्यांची कला अप्रतिम आहे , त्यांच्या कार्याची कायम स्वरूपी दखल घेतली पाहिजे. एकदा अनुचित प्रकार घडण्याआधी समितीने कार्यतत्पर आणि सजग राहावे असे मत ग्रेट -अर्टिस्ट प्रमोद कांबळे यांनी भावना व्यक्त केली.पेशवे काळातही खरे परिवारांचे शिल्पकलेत मोलाचे योगदान! शिल्पकार सुंदरराव आणि नामदेवराव मिस्त्री खरे बंधू यांचे पूर्वत पेशव्यांच्या दरबारात होते शनिवार वाडा बांधकामाच्या कलाकुसरी त्यांचा सहभाग आणि योगदान महत्त्वपूर्ण होते शनिवार वाड्यात प्रवेश करताना दर्शनी भागात फलकावर शिवराम कृष्णा देवजी सुतार यांचा उल्लेख आहे खरे परिवारांचे संगमनेरत वास्तव्य असून अनेक सार्वजनिक धार्मिक क्षेत्रात तन-मन-धनाने सहभागी होतात सुंदर आणि श्री यांनी अहिल्यानगर नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी कास्ट पाषाण सिमेंटच्या कलाकृती मूर्ती सभामंडप देवघर तयार केले आहे अध्यापक आप्पासाहेब खरे यांनी तो अल्बम पुस्तक रुपी अनमोल ठेवा शिल्पकलेतील अनमोल मोती प्रकाशित करून ठेवला आहे▪️▪️▪️▪️▪️▪️▪️© *भारत रेघाटे* 9822961570

 

Accordion body...

परिस्थिती हीच आपल्या आयुष्याची खरी परीक्षा असते.

संत तुकाराम
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin