ग्रेट आर्ट ;-
राशीनची यमाई माता आता सुवर्ण मुकुटात ; मूर्तिकार सुनील नाळकेंच्या अलौकिक कलाकुसरीची परिसरात होतेय प्रशंसा
राशिन ( प्रतिनिधी )
महाराष्ट्रातील अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अतिप्राचीन देवस्थान असलेल्या राशींनच्या यमाई देवीचा मुखवटा आता सुवर्णाचा मुखोटा म्हणून झळकताना दिसून येत असल्याने मंदिर परिसर तेजोमय झाल्याचे येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी सांगितले. सतचंडी यज्ञाच्या शुभप्रसंगी यमाई मातेला सुवर्ण मुखोटा चढविल्याने आनंद व्दिगुणित होत असल्याचे मंदिराचे विश्वस्त विजयकुमार देशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले की, खूप वर्षानंतर आपली इच्छा पूर्ण झाली असून यापूर्वीचे चांदीचे मुखवटे श्रीनाळके यांनीच तयार केल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत कारागीर सुनील नाळके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, दोन किलो वजनाच्या टोपासह देवीचा मुखोटा करण्यास साधारण सव्वा महिण्याचा कालावधी लागला. यामध्ये माणिक आणि पाचू खोवण्यात आल्याचे नाळके यांनी सांगितले. आपल्या सिद्धहस्तकलेने नजर खिळवून ठेवणारे कारागीर म्हणून सुनील नाळके या धातू कारागिराकडे आवर्जून बघितल्या जाते. गेली तीन पिढ्या आपल्या कलेचा हा वारसा ते जोपासत असून या कलेला आणखी झळाळी देत झळकवण्याचे काम नाळके परिवार करीत आहे असे देशमुख यांनी सांगितले. असे सिद्धहस्त लाभलेले कलाकार हे प्रसिद्धीपासून कोसोदूर राहतात त्यापैकी सुनील नाळके हे कारागीर होत. राशीनच्या यमाई मातेला चढवलेला दोन किलो वजनाचा सुवर्ण मुकुटधारी मुखवटा श्री सुनील नाळके यांनी केला यामध्ये त्यांचे चिरंजीव स्वप्निल नाळके यांचेही योगदान लाभले. अप्रतिम अशा कलाकुसर लाभलेल्या कारागिरीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या उत्कृष्ट कारागिरीचे सर्वत्र प्रशंसा होत आहे. सुनील नाळके यांचे चि. स्वप्नील नाळके हे सुध्दा धातुकलाकुसरीत अग्रेसर असून एकुणच अहिल्यानगरीत नाळके परिवार तांबे, पितळ, सुवर्ण, चांदी धातू कारागिरीसह वज्रलेपातही त्यांचा हातखंडा आहे. त्याची धातुकला नजरेत भरणारी असून महाराष्ट्रासह इतर राज्यात सुध्दा अनेक ठिकाणच्या देवस्थानची कामे नाळके यांनी केली आहेत. मंदिर परिसरातील दीपमाळ पाहण्यासारखी असून. वीरभद्राचे मंदिर या ठिकाणी आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर ट्रस्टींनी केले आहे.