*पत्रकाराला अश्लील भाषेत शिविगाळ, जिवे मारण्याची धमकी ; तिघांवर गुन्हा दाखल*
भिवंडी [ प्रतिनिधी ]
ग्रामपंचायकडे माहितीचा अधिकाराद्वारे माहिती मागवून बातम्या प्रसिद्ध केल्या असता मनात राग धरून पत्रकाराला अश्लील भाषेत शिविगाळ करत तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत हकीकत अशी आहे की, भिवंडी तालुक्यातील पडघा, समतानगर येथे राहणारे पत्रकार मिलिंद जाधव यांनी बोरिवली ग्रामपंचायतीमध्ये माहितीचा अधिकाराचा वापर करून आणि माहिती मागवूनच शाळेच्या समस्यांबद्दल बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. याचा मनात राग धरून बोरिवली ग्रामपंचायत सदस्या अश्विनी अशोक कशिवले, अशोक लहू कशिवले, मुलगा अजय अशोक कशिवले यांनी पत्रकार मिलिंद जाधव यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जिवेठार मारण्याची धमकी दिली प्रकरणी बोरिवली ग्रामपंचायत सदस्या अश्विनी अशोक कशिवले, अशोक लहू कशिवले, अजय अशोक कशीवले यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये पडघा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पत्रकाराला न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान चंदे आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करावा असे निवेदन पडघा पोलीस स्टेशनमध्ये दिले होते. तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाला पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यश आले आहे. अश्विनी कशिवले, अशोक कशिवले, अजय कशीवले यांच्या विरोधात महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा कलम ३ व ४ अन्वये पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झाल्टे करीत आहेत.