**तंत्रज्ञानात होणारे बदल अंगीकारून पत्रकारांनी आर्थिक साक्षर व्हावे :- यमाजी मालकर**
{ व्हाईस ऑफ मीडियाने केला ज्येष्ठ पत्रकार तिवारी, नवले, गुंजाळ यांचा सन्मान }
संगमनेर
जगात मोठ्या वेगाने बदल होत आहेत. आपल्यासह वाचकापर्यंत अधिकाधिक चांगल्या पद्धतीने प रिणामकारक ठरणा-या बातम्या पोहोचवण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजे. तंत्रज्ञानाने इतके मोठे बदल घडत आहेत की, त्याचे आकलन वेळीच झाले नाही तर कदाचित आपण जगाच्या खूप मागे राहू. त्यास सामोरे जाण्याची जबाबदारी पत्रकारांचीच आहे. अथवा आपल्यापर्यंत ते पोहोचलेच नाही हे मान्य करावे लागेल. अर्थक्रांतीने देश उसळून निघाला आहे. केवळ राजकारणाला महत्त्व देण्यापेक्षा अर्थक्रांतीच्या गोष्टीला महत्त्व द्या. अर्थकारणावर शोध घेण्यासारखे पत्रकारितेत अनेक विषय मिळतात. त्याबाबतच सातत्याने विचार करावा लागेल. या बदला बाबत इतरांनाही सांगता आला पाहिजे. आपण किती बदललो ही विसंगती लक्षात घेणे गरजेचे आहे. जाती- धर्माच्या, पक्ष, समाज माध्यमाच्या गटापासून पत्रकारांनी लांब राहिले पाहिजे. व्यापक दृष्टीच्या मागे जोपर्यंत पत्रकार पोचणार नाही तोपर्यंत या क्षेत्रात पत्रकारांचा निभाव लागणार नाही. असे मौलिक मत ज्येष्ठ संपादक तसेच थिंक पॉझिटिव्हचे यमाजी मालकर यांनी व्यक्त केले. या आंतरराष्ट्रीय संघटना तसेच संगमनेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बाफना सभागृहात "दर्पण" दिवस आणि "पत्रकार दिना"निमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मालकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वरिष्ठ संपादक, थिंक पॉझिटिव्हचेय माजी मालकर, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, प्राचार्य डॉ अरुण गायकवाड, कार्यकारी सदस्य मधुसुदन नावंदर, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदनेसह अनेक पत्रकार बांधव, विद्यार्थी उपस्थित होते. व्हॉइस ऑफ मीडियाने ज्येष्ठ पत्रकार विलास गुंजाळ, शाम तिवारी, सुनील नवले त्यांच्या कार्यकर्तृत्त्वाची दखल घेतल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मालकर पुढे म्हणाले की, एकीकडे मीडियाचा विस्तार फारच झपाट्याने वाढत आहे. आरोग्य, जागरूकता, नियोजन आणि भविष्या विषयी पत्रकारांनी काळजी घेणे गरजेचे आहे. अर्थकारण महत्त्वपूर्ण आहे त्यास न्याय दिलाच पाहिजे. देशाच्या, राज्याच्या, शहराच्या आणि व्यक्तिगत जीवनातील अर्थकारणाशी आपला घनिष्ट संबंध आहे हे पत्रकारानी कदापि विसरता कामा नये. भविष्याचे आणि कुटुंबाचे नियोजन पत्रकारांनी केले पाहिजे. बदलत्या अर्थक्रांतीकडे पत्रकारांनी फारसे महत्त्व आणि लक्ष दिले नाही ही खंत व्यक्त करून स्वतःची, कुटुंबाची, आणि समाजाची आर्थिक साक्षरता वाढवणे गरजेचे आहे. पत्रकार या बाबत अज्ञानी राहिले आहेत असेही ते म्हणाले. केवळ ऐकीव माहितीवर बातमी करू नये! असे सांगत त्या त्या क्षेत्रातील जाणकाराचे महत्त्व समजून घेणेच संयुक्तिक ठरेल. बातमी विषयी पत्रकाराला तेवढा विश्वास जपता आला पाहिजे. मी जे दिले ते सत्य आहे, योग्य आहे. तंत्रज्ञाना शिवाय पर्याय नाही हे सत्य सर्वांनीच स्वीकारले पाहिजे. एकेकाळी मीडियाने तंत्रज्ञानाचा उपयोग नाकारला होता. स्पर्धेमध्ये काही तरी पॉपुलर करून दाखवणे हे लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे, घातक आहे ते टाळले पाहिजे. आपल्या भूमिकेतही नेमकेपणा असावा. भाषेचे नुकसान मीडिया आणि पत्रकारांनी केले हे वास्तव आहे. अनेक विषय नावीन्याने पुढे येत आहेत. तंत्रज्ञानाचे गांभीर्य विचारात घेतलेच पाहिजे. सभोवती घडणा-या घटना अथवा सर्वकाही पत्रकारांना माहीत असतेच असे नाही. पत्रकार सर्व विषयाला न्याय देऊ शकत नाही. तसेच व्यापक दृष्टी नसेल तर पत्रकार पत्रकारिताही करू शकत नाही. पत्रकारांची दूरदृष्टी ही संकुचित नसावी. सोशल मीडियाच्या वक्तव्यापासून पत्रकारांनी लांब राहिले पाहिजे. माध्यमात आणि पत्रकारितेत बदल होतात हे कदापि म्हणू नका ! सर्व क्षेत्रात बदल होत आहे आपण वेगळे आहोत ही भावना काढून टाकली पाहिजे. आपली संवेदनशीलता जिवंतपणा जपून ठेवता आला पाहिजे असे मालकर म्हणाले.
{ व्हाईस ऑफ मीडियाचे केले कौतुक } पत्रकारांचा आवाज दर्जेदार बनविण्यासाठी संदीप काळे यांनी व्हाईस ऑफ मीडियाचेउ भे केलेले संघटन हे कौतुकास्पद आहे. पत्रकारांना कोणाचाही आधार नाही. खरं तर कोणत्याही राजकीय नेत्याची मदत नाही, सरकारच्या हातात फारशे काही नाही. दिवसें दिवस मीडियाचा विस्तार वाढत आहे. व्हॉइस ऑफ मीडियाने एक सक्षम विचार मंच स्थापन केल्याबद्दल संघटनेचे त्यांनी कौतुक केले. पत्रकारांचे आर्थिक नियोजन आणि आरोग्या बाबत सूत्रबद्ध आराखडा तयार केल्यास फायदेशीर ठरेल असेही मालकर म्हणाले.
नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, जिथे लोकशाही आहे तिथे चारही स्तंभ येतात. ही चारही स्तंभ खूप महत्त्वाची असून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजेच पत्रकारांची भूमिका. ती वॉच डॉग सारखी असते. पत्रकारांना समाजातील प्रत्येक घटनेकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. पत्रकारांनी पत्रकाराची भूमिका सजगपणे पार पाडावी असेही तांबे म्हणाले.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, पत्रकार देश वाचविण्याचे काम करतात. याबरोबर अराजकता थांबविण्याचे काम पत्रकार करत असतो. पत्रकार हा समाजाचा डोळा आहे. वृत्त हे निर्भीड आणि खरे असावे. प्राचार्य डॉ अरूण गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले तर व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी संघटनेच्या कार्याबाबत माहिती दिली. सूत्रसंचलन विजय पाटील यांनी केले. आभार आनंद गायकवाड यांनी मानले.